भाजपच्या माजी नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:24 AM2021-02-18T06:24:32+5:302021-02-18T06:24:50+5:30
Uran : राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल केल्याचे भरत जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
उरण : उरण तालुक्यातील जांभुळपाडा येथील विकलेली जमीन पुन्हा परस्पर दुसऱ्यालाच विक्री केल्याप्रकरणी नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर उरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनआरआय कॉप्लेक्समध्ये राहणाऱ्या रजनी सेहगल यांना भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी कविता जाधव यांनी उरण तालुक्यातील जांभूळपाडा येथील २२ गुंठे जमीन विकली आहे. जुलै २०१८ मध्ये सुमारे ३० लाख रुपयांना विकलेल्या जमिनीची किंमत सेहगल यांनी दोन टप्प्यात बँक खात्यातून अदाही केली आहे. या जागेत बांधण्यात आलेल्या घरांची घरपट्टी नावावर करून घेण्यासाठी सेहगल गेल्या असता ही जमीन जाधवांनी अन्य चार व्यक्तींना विकली असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाधव दाम्पत्यांच्या विरोधात उरण पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल केल्याचे भरत जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.