तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:35 PM2020-02-12T18:35:49+5:302020-02-12T18:36:25+5:30
शेतक-यांसाठीच्या हमी दरात तूर खरेदी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली होती.
यवतमाळ - नाफेडने महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटीिंग फायनान्सच्या माध्यमातून शेतक-यांसाठी हमी दरात तूर खरेदी केंद्र उघडले होते. या हमी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली. यात फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांनी दिली. या गुन्ह्यात स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवकासह दोघांना अटक केली.
दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरिभाऊ काशीनाथ गुल्हाने (५८) रा.तेलीपुरा दारव्हा, अमीन बाहोद्दिन मलनस (५०) रा.वडगाव गाढवे ता.दारव्हा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरोधात १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दारव्हा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार यांच्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला. या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य सूत्रधार माजी नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने हा पसार होता. त्याने सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून आरोपी पसार होता. त्याला अटक झाल्याने या गुन्ह्यातील आणखी वास्तव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखा पथकाने केली आहे.