तलवार हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:11 PM2019-12-14T21:11:53+5:302019-12-14T21:12:47+5:30
माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलाने केलेल्या या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले होते.
कोल्हापूर : अंबाई टॅँक परिसरात खाद्य पदार्थाच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, त्यांचा मुलगा सागर टिपुगडे (रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) या दोघा बापलेकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यामध्ये स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय ३२) व अजय विलास पाटील (३६, रा. दोघे माजगावकर मळा) हे जखमी झाले होते. ११ डिसेंबरला हा प्रकार घडलेला.
पोलिसांनी सांगितले, स्वप्निल पाटील व अजय पाटील हे दोघेजण ११ डिसेंबरला सायंकाळी शालिनी पॅलेसच्या पिच्छाडीस असलेल्या अंबाई टॅँक परिसरातील खाद्य पदार्थाच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे वाद झाला, त्यामध्ये दोघांनी पुढाकार घेतला. यावेळी गर्दीतून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर तलवार हल्ला केला. दोघांच्या डोक्यात तलवारीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. जखमी स्वप्निल पाटील याने फिर्याद दिली आहे. त्यामध्ये स्वप्निल व त्याचा मित्र अजय यांचा अंबाई टँक परिसरातील आईस्क्रिमचा गाडा चालविणा-या कामगारासी वाद झाला होता. त्याने मालक टिपुगडे पितापुत्रांना बोलवून घेतलेनंतर हा हल्ला झाला होता. गुन्हा दाखल झालेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता ते पसार झाले आहेत. सहायक निरीक्षक सत्यराज घुले तपास करीत आहेत.