ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, महिलेविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:39 AM2023-09-02T07:39:41+5:302023-09-02T07:40:10+5:30
या महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या आरोपावरून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : घाटकोपरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकल खाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रात्री फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले होते. मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून नीलिमा चव्हाण नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या आरोपावरून पोलिस अधिक तपास करत आहेत.
सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते. त्यांनी, विधानसभा निवडणूकही लढवली होती. गुरुवारी रात्री फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले. गाडी आणि सुरक्षा रक्षक यांनाही घरीच थांबवून, कामानिमित्त जात असल्याचे सांगून रिक्षाने घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. रात्री अकराच्या सुमारास ट्रॅकवर झोपले. त्याचदरम्यान, कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलखाली येत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला.
महिलेकडून ब्लॅकमेलिंगचा आरोप
नीलिमा चव्हाण नावाची महिला त्यांच्या ओळखीची असून ती अनेकदा वडिलांना कॉल करून ब्लॅकमेल करत असल्याचा संशय मोरे यांच्या मुलाने पोलिसांकडे वर्तवला आहे.
अनेकदा तिच्यासोबत कॉलवर बोलताना वडिलांना पाहिल्याचेही पोलिसांना सांगितले आहे. मुलाच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.