पुणे पोलिसांचे पुन्हा एकाचवेळी जळगावसह सहा ठिकाणी धाडसत्र, माजी उपनगराध्यक्षाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:50 AM2021-06-17T08:50:50+5:302021-06-17T10:24:54+5:30
crime news : जळगाव शहरातून सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना सहा वाजता झाला घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथून पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी ,भुसावळ, औरंगाबाद, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र सुरू केले. जळगाव शहरातून सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना सहा वाजता झाला घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथून पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
भागवत भंगाळे यांना जिल्हापेठ तर संजय तोतला यांना शहर पोलिस ठाण्यात बसवण्यात आलेले आहे. इतर सर्व जणांना त्या त्या पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. दिवसभर ही कारवाई चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक व्यापाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच महिन्यात पुणे पोलिस दुसऱ्यांदा जळगावात आले.
यांना केली अटक
सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या १२ जणांना गुरुवारी एकाच वेळी अटक करण्यात आली आहे. यासाठी १५ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.
मोठे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशात समायोजित केली
आर्थिक गुन्हे शाखेचे पंधरा पथके या कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेली आहेत. अटकेतील या सर्व जणांनी मोठमोठी कर्ज घेऊन ती ठेवीदारांच्या पैशात समायोजित केल्याचे पुरावे मिळालेले आहेत. यात ठेवीदारांचे पैसे बुडाले तर कर्जदार मालामाल झालेले आहे.
जळगाव सहा ठिकाणी पंधरा पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. दिवसभर अटक व पंचनाम्याची कारवाई चालेल, त्यानंतर पथक पुण्याकडे रवाना होईल. अटकेतील व्यक्तींबाबत ठोस पुरावे मिळालेली आहेत.
- भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे