माजी नगराध्यक्षांच्या मुलाकडून २० लाखांची खुनाची सुपारी! साताऱ्यामध्ये सात जणांना केली अटक

By दत्ता यादव | Updated: February 20, 2025 22:42 IST2025-02-20T22:41:22+5:302025-02-20T22:42:16+5:30

धीरज ढाणेचा करायचा होता गेम; दोन पिस्तूल, गुप्ती हस्तगत

Former mayor's son's murder case worth Rs 20 lakhs! Seven people arrested in Satara | माजी नगराध्यक्षांच्या मुलाकडून २० लाखांची खुनाची सुपारी! साताऱ्यामध्ये सात जणांना केली अटक

माजी नगराध्यक्षांच्या मुलाकडून २० लाखांची खुनाची सुपारी! साताऱ्यामध्ये सात जणांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: विधानसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांचे पती वसंत लेवे (आण्णा) यांना मारहाण झाल्याचा राग मनात धरून धीरज ढाणे (वय ४५, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा गेम करायचा होता. यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश लेवे याने संशयितांना २० लाखांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला गुरुवारी पहाटे एकत्र जमलेल्या पाचजणांच्या सशस्त्र टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली. पोलिसांच्या तपासात वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली. अनुज चिंतामणी पाटील (२१, रा. गुरुवार पेठ), दीप भास्कर मालुसरे (१९, रा. गुरुवार पेठ, शिर्केशाळेजवळ, सातारा), आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (२५, रा. हनुमाननगर, इचलकरंजी, कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (२५, रा. जवाहरनगर इचलकरंजी, कोल्हापूर), क्षितिज विजय खंडाईत (रा. गुरुवार पेठ) या पाचजणांना अटक केली. सुरुवातीला या संशयितांनी आम्ही साताऱ्यातील एका सराफ पेढीवर दराेडा टाकणार होतो, अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच धक्कादायक माहिती समोर आली.

विधानसभा निवडणुकीवेळी सातारा पालिकेचे माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याचा राग मनात धरून लेवे यांच्या मुलाने धीरज ढाणे याला मारण्यासाठी अनुज पाटील याला २० लाखांची खुनाची सुपारी दिली. त्यातील २ लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते. येत्या दोन दिवसांत साताऱ्यात खुनाची गंभीर घटना घडणार होती. मात्र, पोलिसांनी तत्पूर्वीच हल्लेखोरांचा डाव उधळून लावला. पोलिसांनी तातडीने हालचाली करून खुनाची सुपारी देणारा नीलेश लेवे (रा. चिमणपुरा पेठ) व त्याचा मित्र विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) या दोघांना अटक केली. सर्व संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी सापडली टोळी

शहर पोलिस ठाण्यातील बिट मार्शल शहरात गस्त घालत होते. त्या दरम्यान डायल ११२ वरून अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला काही युवक दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमले असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांची जादा कुमक तेथे पोहोचून सर्व संशयितांना धरपकड करून ताब्यात घेतले.

ही शस्त्रे सापडली

संशयितांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन लोखंडी सुरे व महागडे मोबाइल, दोन दुचाकी आढळून आल्या.

काय होता वाद

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात नीलेश लेवे व पप्पू लेवे यांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. या मारहाणीचा राग निलेश याच्या डोक्यात होता.

Web Title: Former mayor's son's murder case worth Rs 20 lakhs! Seven people arrested in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.