माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची कारागृहात रवानगी; सत्र न्यायालयाचा कारवाईचा दणका
By जितेंद्र ढवळे | Updated: February 17, 2025 22:58 IST2025-02-17T22:56:41+5:302025-02-17T22:58:45+5:30
पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात वॉरंटची अंमलबजावणी

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची कारागृहात रवानगी; सत्र न्यायालयाचा कारवाईचा दणका
नागपूर: पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या खटल्यात आरोपी असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची सोमवारी सत्र न्यायालयामधून थेट कारागृहात रवानगी करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या खटल्याच्या तारखांना जाधव वारंवार अनुपस्थित राहत होते. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. परिणामी, जाधव यांनी सोमवारी न्यायालयात हजर होऊन अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा न्यायालयाने त्यांना, ते स्वत:च्या बचावासाठी कोणते साक्षीदार तपासणार आहेत, अशी विचारणा करून साक्षीदारांची यादी मागितली. परंतु, जाधव यांनी याकरिता १० दिवसाचा वेळ देण्याची मागणी केली. त्यांचा हा निष्काळजीपणा व इतर काही बाबी लक्षात घेता न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना १७ डिसेंबर २०१४ रोजी वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. त्या दिवशी उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होती. त्यांनी बैठक संपेपर्यंत कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली होती. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये गेले असता सुरक्षा ताफ्यात समावेश असलेले स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार दिला. परिणामी, हर्षवर्धन जाधव चिडले व त्यांनी पराग जाधव यांना थापड मारली आणि तेथून निघून गेले. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला व प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला. तो खटला न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांच्यासमक्ष प्रलंबित आहे.
छातीत दुखायला लागले, ‘मेयो’त भरती केले
अटक कारवाईनंतर पोलिस हर्षवर्धन जाधव यांना कारागृहात घेऊन जात होते. दरम्यान, जाधव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी जाधव यांना भरती करून उपचार सुरू केले.