अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी माजी आमदाराला 25 वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:10 PM2021-08-26T22:10:40+5:302021-08-26T22:10:58+5:30
25 वर्षांच्या तुरुंगवासासह कोर्टानं आमदारावर 15 लाखांचा दंडही ठोठावला आहे.
शिलाँग: मेघालयचा माजी आमदार ज्युलियस डोरफांगला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी री-भोई जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयानं 25 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्युलियस डॉरफांग आमदार असतानाची ही घटना आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती फॅब्रोनियस सिल्कम संगमा यांनी डोरफांगला 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. डोरफांग HNLC या कट्टरतावादी गटाचा संस्थापक अध्यक्ष देखील आहे.
इतर तीन जणांना शिक्षा
माजी आमदार ज्युलियस डोरफांग यांने 2007 मध्ये एचएनएलसीचे अध्यक्ष म्हणून शरणागती पत्करली आणि 2013 मध्ये मावाठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी डोरफांगला दोषी ठरवत 17 ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावली. याप्रकरणात न्यायालयानं आणखी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेरिशा मैरी खारबामोन, मामोनी परवीन आणि तिचा पती संदीप बिस्ववर पीडित तरुणीला गुन्हेगारी क्षेत्रात ओढणे आणि बळजबरीनं वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
2016 मध्ये अटक करण्यात आली
डॉर्फांगचे वकील किशोर सी. गौतम म्हणाले की, या निर्णयाविरोधात ते मेघालय उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. डोरफांगला डिसेंबर 2016 मध्ये पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलिसांनी राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग (एससीपीसीआर) कडून दाखल तक्रारीच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये एससीपीसीआरनं री-भोई येथे दुसरी तक्रार दाखल केली होती, ज्यात डोरफांगनं जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या तक्रारींच्या आधारे डोरफांगविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यादरम्यान काही काळ तो बेपत्ताही झाला होता. पण, 7 जानेवारी रोजी शेजारील आसाम राज्यातील एका बस टर्मिनलवरुन त्याला अटक करण्यात आली.