पोलिसांचा दरारा आहे की नाही? भर दिवसा गुंडांची दबंगगिरी; नेव्हीच्या माजी अधिकाऱ्यावर पोलीस चौकीसमोरच हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 09:14 PM2021-12-25T21:14:35+5:302021-12-25T21:22:24+5:30
अंबरनाथ येथे गावगुंडांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी ब्रिजेश कुमार सिंह हे शनिवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्वामी समर्थ चौकातून आपल्या घरी निघाले होते.
अंबरनाथ- गाडीवर नंबर प्लेट नसताना आणि भरधाव वेगाने कट मारून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला नेव्हीच्या एका अधिकाऱ्याने हटकल्याने दोन तरुणांनी त्या अधिकाऱ्यावर हल्ला करीत जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हुतात्मा चौकातील पोलीस चौकीच्या पायरीवरच घडला. पोलीस चौकीसमोरच गावगुंड दबंगगिरी करीत असल्याने पोलिसांचा दरारा शिल्लक राहिलेला नाही हे उघड झाले आहे.
अंबरनाथ येथे गावगुंडांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी ब्रिजेश कुमार सिंह हे शनिवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्वामी समर्थ चौकातून आपल्या घरी निघाले होते. याच वेळी स्वामी समर्थ चौकातून चार तरुण भरधाव वेगाने आणि मोबाईलवर बोलत अनेकांना कट मारून जात होते. त्यातील एका तरुणाला ब्रिजेश कुमार यांनी हटकले आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवू नका असे सांगितले. मात्र या तरुणांना त्याचा सल्ला आवडला नाही आणि त्यांनी थेट हुतात्मा चौकातच ब्रिजेश कुमार सिंह त्यांच्या गाडी पुढे स्वतःची गाडी आडवी घालून त्यांना रोखले. सुरुवातीला त्या गावगुंडांनामध्ये आणि ब्रिजेशकुमार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी ब्रिजेश कुमार यांनी स्वतःची ओळख सांगत आपण नेव्हीतील अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र त्या चार तरुणांपैकी दोन तरुणांनी त्यांना न जुमानता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस ब्रिजेश कुमार यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्या दोघा तरुणांनी दगडाने आणि दांडक्याने ब्रिजेश कुमार यांना मारहाण केली.
हा सर्व प्रकार हुतात्मा चौकातील पोलीस चौकीसमोरच घडत होता. मारहाण सुरू असताना त्यातील एका तरुणाने शेजारी असलेल्या गॅरेजमधून सायलेन्सरचा रॉड घेऊन येण्यास सांगितल्याने ब्रिजेश कुमार यांना आपला जीवितास धोका निर्माण झाल्याची चाहूल लागली. यानंतर, त्यांनी या गुंडांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणांनी गाडीवर देखील त्यांचा पाठलाग करीत अंबरनाथ पश्चिम भागातील नगरपालिका कार्यालयाजवळ त्यांना पुन्हा चालू गाडीवर दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवितास धोका असल्याचे लक्षात येताच ब्रिजेश कुमार यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी हा प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्याठिकाणी तक्रार करण्याचा सल्ला दिला.
ब्रिजेश कुमार यांना या गावगुंडांची तक्रार करण्यासाठी पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यावे लागले. शहरातील गावगुंड थेट पोलीस चौकीसमोरच एका नेव्हीतील उच्चपदस्थ सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाच मारहाण करीत असतील तर त्यांच्यावर लगाम लावण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.