चर्चा तर होणारच! माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी कॅबने ED कार्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:23 PM2022-07-05T18:23:40+5:302022-07-05T19:55:51+5:30
Sanjay Pandey :१ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते.
NSE-co Location Scam:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मंगळवारी कथित नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात कॅबने पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत त्यांचा जबाब नोंदवला. १ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते.
1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पांडे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय पांडे आज सकाळी 11.20 वाजता कॅबने ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सकाळपासून मीडिया त्यांना या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी उभा होता. पांडे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी सुट्टी देण्यात आली. यादरम्यान ईडीने पांडे यांचा जबाब नोंदवला.
चर्चा तर होणारच! माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी कॅबने ED कार्यालयात पोहोचले pic.twitter.com/aIHEVqmX17
— Lokmat (@lokmat) July 5, 2022
याप्रकरणी चौकशी केली
पांडे यांची ईडीची चौकशी आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या कामकाजाशी संबंधित आहे. आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, इतर काही कंपन्यांपैकी एक, कथित को-लोकेशन अनियमिततेनंतर NSE चे सुरक्षा ऑडिट केले होते. मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.
एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचा जबाब आधीच नोंदवला आहे. रामकृष्ण तिहार तुरुंगात आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी रामकृष्ण आणि समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत सीबीआयच्या तक्रारीची दखल घेतली होती. NSE मधील या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करणारी आयकर विभाग ही तिसरी एजन्सी आहे.