माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:20 PM2021-06-30T17:20:53+5:302021-06-30T18:09:13+5:30
Former police commissioner's son handcuffed by Bandra police : वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - दिवंगत आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांच्या मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज त्यागी यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फिर्यादी ही रामदेव त्यागी यांची सून असून आरोपी राज त्यागी यांची पत्नीच आहे. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर राज यांना काल सायंकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली.
आईस्क्रीममधून वडिलांनी ३ चिमुकल्यांना दिलं उंदीराचं औषध; एकाचा झाला मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर https://t.co/j1eDlZsPtm
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2021
रामदेव त्यागी हे महाराष्ट्र कॅडरचे १९६४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलीस आयुक्त म्हणूनही १ नोव्हेंबर १९९५ ते २ डिसेंबर १९९६ या कालावधीत त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे महासंचालक असताना ते सेवानिवृत्त झाले होते. १९९३ मधील दंगलीच्या कालावधीत त्यागी हे मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त होते. त्यांच्या नेतृत्वात पथकाने सुलेमान बेकरीत केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी २००१ साली राज्य सरकारच्या विशेष पथकाने १८ पोलिसांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र यातील ९ जणांची न्यायालयाने २००३ मध्ये निर्दोष मुक्तता केली होती, त्यामध्ये त्यागी यांचाही समावेश होता.