विनयभंगप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:57 PM2020-03-21T17:57:23+5:302020-03-21T17:59:32+5:30
‘मुंबई शाहीनबाग’च्या ठिकाणी आंदोलकांशी वादावादी
मुंबई : मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त व वंचित आघाडीचे नेते समशेर खान पठाण यांना त्याच्या एका सहकाऱ्यासह नागपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नागपाडा येथे सुरु असलेल्या मुंबई शाहीनबाग आंदोलनाच्या ठिकाणी एका महिला आंदोलकांशी हुज्जत घालून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत हा वाद सुरु होता.
दरम्यान, आपल्यावर राजकीय द्वेषातून तक्रार करण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. सुमारे ७ वर्षापूर्वी खात्यातून निवृत्त झालेल्या पठाण यांनी अवामी लीग या राजकीय पक्षाची स्थापना केली असून गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी वंचित आघाडीच्यावतीने मुंबादेवी येथून निवडणूक लढविली होती. सीएए, एनआरसी विरोधात मुंबईत नागपाडा येथील मोरलॅड रोड येथे सुरु असलेल्या महिलांच्या आंदोलनाला त्यांनी पांठिबा दिला होता. मात्र सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील शाहीन बाग आंदोलन ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनही स्थगित करावे, असा विचार आंदोलनकर्त्यांनी केला होता, त्याला काहींचा विरोध होता.
महिला आंदोलन स्थगित करण्याच्या पवित्र्यात असताना पठाण यांनी शुक्रवारी रात्री त्याठिकाणी जावून आंदोलन मागे घेवू नये, असा आग्रह करु लागले, त्यातून त्यांच्याबरोबर वादावादी झाली. त्यावेळी कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की झाली, पोलिसांनी हस्तक्षेप करुन वाद मिटविला. मात्र एका महिलेने पठाण यांनी मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत आपल्याला धक्काबुकी करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शनिवारी नागपाडा पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पठाण , फय्याज अहमद व अन्य तिघाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पठाण व अहमद यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.