हत्येची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात राजस्थान सीमेवर केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:51 AM2021-07-22T10:51:36+5:302021-07-22T10:52:10+5:30
तपासादरम्यान बबलू गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते.
पुणे : विरोधी टोळीतील गुन्हेगाराच्या हत्याची सुपारी देणार्या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याला कोंढवा पोलिसांनी गुजरात राजस्थान बॉर्डरवर अटक केली. यापूर्वी कोंढवा पोलिसांनी राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख या दोघांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांना बबलू गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासाठी या दोघा गुन्हेगारांना यादव याने ३ पिस्तुले व ७ काडतुसे व रोख रक्कम दिली होती.
विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी आणि विवेक यादव यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी आहे. यादव याच्यावर बबलु गवळी याने २०१६ मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती.
राजमणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक यादव फरारी झाला होता. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी तीन पथके शोध घेत होती. तो गुजरात बॉर्डरवर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरात आणि राजस्थान सीमेवरून अटक केली.