पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक; माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 10:02 PM2023-07-09T22:02:25+5:302023-07-09T22:02:39+5:30
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानुसार भ्रष्टाचाराविरोधात सुरु असलेल्या मोहिमेतून ही कारवाई केल्याचे व्हिजिलन्स टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. पंजाब व्हिजिलन्स ब्युरोच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोनी यांनी २०१६ ते २०२२ या कालावधीत हा काळा पैसा जमविल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानुसार भ्रष्टाचाराविरोधात सुरु असलेल्या मोहिमेतून ही कारवाई केल्याचे व्हिजिलन्स टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोनी यांना सोमवारी अमृतसरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. ओपी सोनी चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2022 पर्यंत माजी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 4,52,18,771 रुपये होते, तर खर्च 12,48,42,692 रुपये होता. पत्नी सुमन सोनी आणि मुलगा राघव सोनी यांच्या नावे अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या असे अधिकाऱ्याने सांगितले.
तपासाअंती ओपी सोनी यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दक्षता ब्युरो, अमृतसर रेंज येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (बी) आणि १३ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ओमप्रकाश सोनी हे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. तर चन्नी सरकारमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, स्वातंत्र्य सैनिक आणि अन्न प्रक्रिया या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. ओपी सोनीच नाही तर दक्षता ब्युरो पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचीही बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करत आहे.