माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:58 AM2024-10-17T10:58:49+5:302024-10-17T11:06:32+5:30
Fraud with VK Singh Daughter : याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.
Fraud with VK Singh Daughter : गाझियाबाद : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि गाझियाबादचे माजी खासदार सेवानिवृत्त जनरल व्हीके सिंह यांची मुलगी योजना सिंह यांनी व्यावसायिक आनंद प्रकाश यांच्याविरोधात जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
२०१४ मध्ये राजनगर सेक्टर-२ मधील एका घराचा व्यवहार व्यावसायिकासोबत ५.५ कोटी रुपयांना केला होता. त्यावेळी साडेतीन कोटी रुपये घेऊनही व्यावसायिकाने विक्रीपत्र तयार केले नाही, असा आरोप योजना सिंह यांनी केला आहे. याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.
व्हीके सिंह यांची मुलगी योजना सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०१४ मध्ये राजनगरमधील घराचा व्यवहार केल्यानंतर व्यावसायिक आनंद प्रकाश यांना जवळपास ३.५ कोटी रुपये दिले. त्यानंतरही व्यावसायिक आनंद प्रकाश यांनी विक्रीपत्र केले नाही.
बनावट पावती बनवल्याचा आरोप
ऑगस्टमध्ये आनंद प्रकाश यांच्या वतीने चुकीच्या तथ्यांच्या आधारे नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यावर त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत उत्तर पाठवले होते. त्यांना दिलेल्या पैशांचा अपहार करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप योजना सिंह यांनी केला आहे. बनावट पावती बनवून एडीएम कोर्टात निष्कासनाचा खटला दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. डीसीपी सिटी राजेश कुमार यांनी सांगितले की, कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजनगर येथील घराच्या व्यवहाराबाबत खटला सुरू आहे. लवकरच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
राजनगरमधील घर व्यवहार प्रकरण
घरावर कर्जही काढण्यात आल्याचे त्यांच्या माहितीतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी व्हीके सिंह यांनी चुकीच्या तथ्यांवर आधारित बातम्या चालवल्याबद्दल आनंद प्रकाश आणि एका मीडिया व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. तसेच, व्हीके सिंह यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी यूट्यूब-आधारित न्यूज पोर्टलच्या मालकाला अटक केली होती. व्हीके सिंह यांनी तक्रारीत यूट्यूबवर प्रसिद्ध केलेली माहिती निराधार आणि तथ्य नसलेली असल्याचे म्हटले होते.