11 वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा; मैत्रिणीच्या मुलीवरच टाकला फास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:28 PM2021-10-01T14:28:59+5:302021-10-01T15:03:43+5:30
Crime News : गुन्हे शाखेची कारवाई, तीन महिला गजाआड
नागपूर : ११ वर्षांच्या मुलीच्या कौमार्याचा ४० हजारात सौदा करून तिला प्रौढ ग्राहकाच्या हवाली करणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अर्चना शेखर वैंशपायन (वय ३९, रा. खरबी), रंजना चतुर्भुज मेश्राम (वय ४५, गोधनी) आणि कविता पुरुषोत्तम निखारे (वय ३०, रा. बांगलादेश, नाईक तलाव) अशी या महिलांची नावे आहेत.
अर्चना या टोळीची सूत्रधार आहे. तिने तिच्या मैत्रिणीच्या अकरा वर्षीय मुलीला काही दिवसांपूर्वी बर्थ डे पार्टीत जायचे आहे, म्हणून सोबत नेले. मुलीला फूस लावून "वेश्याव्यवसायात खूप रक्कम मिळते", असे सांगून तिने शरीर विक्रय करण्यास मुलीस बाध्य केले. त्यानंतर तिला रंजनाच्या कोराडी मार्गावरील ओम नगरात असलेल्या सदनिकेत नेले. तिथे कविता तिच्यासाठी ग्राहक शोधू लागली. अकरा वर्षाच्या मुलीचे कौमार्य विकायचे आहे, मुलगी खूप सुंदर आहे, असे सांगून कविता आणि तिच्या साथीदारांनी अनेक आंबटशौकिनांशी संपर्क केला. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट गग्राहकाच्या माध्यमातून आरोपी महिलांशी संपर्क साधला चाळीस हजारात मुलीच्या कौमार्याचा सौदा ठरल्यानंतर पोलिसांनी तयार केलेला हा बनावट ग्राहक गुरुवारी रंजनाच्या सदनिकेत पोहोचला. त्याच्याकडून रक्कम घेतल्यानंतर महिलेने शरीरसंबंधासाठी त्या व्यक्तीच्या हवाली अकरा वर्षीय मुलीला केले. बाजूच्या रूममध्ये मुलीला घेऊन गेल्यानंतर आजूबाजूलाच घुटमळत असलेल्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तेथे छापा घातला. आरोपींच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर अर्चना वैशंपायन, रंजना मेश्राम आणि कविता निखारे या तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक मुलींचे जीवन उध्वस्त
या टोळीची सूत्रधार अर्चना अनेक वर्षांपासून या गोरख धंद्यात सक्रिय आहे. ती आधी कुंटनखाना चालवायची. ती आणि तिच्या महिला साथीदारांनी अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. पैशाचे आमिष दाखवून त्यांनी अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ओढले आहे.