अमेरीकन एक्सप्रेस बँकच्या चार खातेदारांना सात लाखांचा आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:07 PM2018-09-05T14:07:20+5:302018-09-05T14:09:28+5:30
मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
अकोला - अमेरीकन एक्सप्रेस बँकेचे खातेदार असलेले तसेच क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्या चार जनांच्या क्रेडीट कार्डचा रजिस्टर नंबर व बँक खात्यासाठी दिलेला मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी बँकेच्या अधिकाºयांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली होती.
डाबकी रोडवरील आश्रय नगरातील रहिवासी प्रतिक सुभाषराव कराळे, पार्वती नगरातील रहिवासी विक्की गव्हाळे, अर्पीत यादव व सरस्वती नगर येथील रहिवासी तुळशीदास मारोती साबळे या चार जनांच्या टोळीने अमेरिकन एक्सप्रेस बँकेतील निरंजन मुखोपाध्याय, इकबालसिंग सौंद, गौतम खन्ना व अंशुमन बाफना यांच्या बँक खात्याच्या क्रेडीट कार्डचा रजिस्टर नंबर व खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक ‘हॅक’करून बदलला. त्यानंतर या चारही बँक खातेदारांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. या चार जनांमधील मुखोपाध्याय यांच्या खात्यातून २ लाख २ हजार रुपये, सौंद यांच्या बँक खात्यातून २ लाख १९ हजार, खन्ना यांच्या खात्यातून १ लाख १९ हजार आणि बाफना यांच्या खात्यातून २ लाख २४ हजार रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. या चार जनांच्या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचेही समोर येत आहे. या टोळीने आॅनलाईन खरेदी करून लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे बँक अधिकाºयांच्या लक्षात येताच बँकेचे सुरक्षा अधीकारी मिलींद रामचंद्र चव्हाण यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली. त्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी या चार जनांविरुध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली होती.