१८ लाखांच्या लुटमारीचा छडा चार आरोपी गजाआड : पावणे सात लाखांची रोकडही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:41 PM2020-06-02T23:41:27+5:302020-06-02T23:43:58+5:30
सोमवारी दुपारी आमदार निवासजवळ घडलेल्या १८ लाखांच्या लुटमारीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी चौघांच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख ७६ हजार रुपयांची रोकड तसेच दोन दुचाक्या असा साडेआठ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी दुपारी आमदार निवासजवळ घडलेल्या १८ लाखांच्या लुटमारीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी चौघांच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख ७६ हजार रुपयांची रोकड तसेच दोन दुचाक्या असा साडेआठ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
योगेश विनायक सत्रमवार, मंगेश वासुदेव पद्मगिरवार, आकाश मोरेश्वर धोटे आणि निकी उर्फ निखिल धनराज गोखले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे पाच ते सात साथीदार फरार आहेत.
विविध शासकीय निमशासकीय संस्था आणि व्यापारी प्रतिष्ठानांकडून रक्कम संकलित करून ती त्यांच्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम करणारी ब्रिंकस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी श्रीकांत नानाजी इंगळे आणि सतीश धांदे हे दोघे सोमवारी दुपारी दीड वाजता १८ लाख, ३१ हजारांची रोकड असलेली बॅग घेऊन सिव्हिल लाईन मधील ॲक्सिस बँकेकडे चालले होते. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना लाथ मारून खाली पडले आणि नंतर चाकूचा धाक दाखवून रोकड असलेली ही बॅग हिसकावून पळून गेले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली होती.
सीताबर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तर या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करू लागले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. निलेश भरणे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात आरोपींचा शोध घेऊ लागली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मधून हाती लागलेले धागा पकडून पोलिसांनी गोपालकृष्ण नगर वाठोडा या भागात राहणाऱ्या योगेश सत्रमवार आणि मंगेश पद्मगिरवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आकाश धोटे आणि निकी गोखले यांनाही पकडले. या चौघांनी गुन्ह्याची कबुली देतानाच त्यांच्याकडे ठेवलेली सहा लाख,७६ हजारांची रोकड पोलिसांच्या हवाली केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्याही पोलिसांनी जप्त केल्या.
अनेक दिवसांपासून होती योजना
या गुन्ह्यात सहा आरोपी असल्याचे तक्रारकरते इंगळे आणि त्यांच्यासोबतचे धांदे यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र या गुन्ह्यात आठ ते दहा आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासात आरोपींच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेच्या तपास पथकाचे अभिनंदन केले. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपयुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, राजकुमार त्रिपाठी, हवालदार रवींद्र मांडे, शंकर शुक्ला, नायक नरेंद्र ठाकूर, रवी अहिर, प्रविन रोडे, कुणाल मसराम, सागर ठाकरे, प्रमोदसिंग ठाकूर, सुहास शिंगणे, घोंगडे, रोहित काळे, तसेच हवलदार देविदास दुबे यांचे डॉ. उपाध्या यांनी आज कौतुक केले. या पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले.