दुचाकी चोरणाऱ्या दोन गुन्ह्यातील चार आरोपींना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:51 PM2023-08-12T15:51:10+5:302023-08-12T15:51:55+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाची कामगिरी
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरार व अर्नाळा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यातील चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे. विरार स्टेशन जवळील पे अँड पार्क मधून दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी ४ ऑगस्टला विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर न्यू विवा कॉलेजच्या परिसरातून दुचाकी चोरी झाल्याने अर्नाळा पोलिसांनी ५ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही दाखल गुन्ह्यांचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून अर्नाळा येथील गुन्ह्यामध्ये आरोपी मामुन चौधरी (२०) आणि अनुराग सिंग (१९) तर विरारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी ग्लेन कॅस्टेलिनो (२४) आणि पीटर कॅस्टेलिनो (३१) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये मामुन आणि अनुराग या दोघांनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरली आहे. तर ग्लेन आणि पीटर या दोन्ही सख्या भावांनी स्वतःच्या दुचाकीमध्ये दुसऱ्या दुचाकीचे पार्ट लावण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही गुन्ह्यातील चोरी करण्यात आलेल्या २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या दोन्ही दुचाकी आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, भुपेंद्र टेलर, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सागर सोनवणे, गणेश यादव आणि संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.