तरुणाच्या खून प्रकरणातील ४ आरोपी ४८ तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 07:38 PM2018-12-24T19:38:02+5:302018-12-24T19:38:23+5:30
ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊन यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या होत्या
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील रुळे येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर ४८ तासांत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शुक्रवारी (दि.२१ डिसें.) संध्याकाळी ७.३० वा. मौजे रुळे (ता. वेल्हे) येथील पिंगारा हॉटेलमध्ये आरोपी नवनाथ धाकू उघडे याची पत्नी, माजी सरपंच छाया उघडे या रुळे गावच्या सरपंच असताना ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊन यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील मयत सागर खंडू निवंगुणे हा रोहिदास शेजवळ याचा मित्र असून, त्याने ग्रामपंचायतीचा घोटाळा उघडकीस आणण्यास मदत केली होती. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कट रचून रामदास बबन निवंगुणे व सागर खंडू निवंगुणे हे दोघे जण पिंगारा हॉटेलमध्ये बसले असताना जीपमधून येऊन सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याचा खून केला. रामदास निवंगुणे यांनी याबाबत फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी हे फरार झाले होते. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व गुन्ह्यातील आरोपी हे फरार असल्याने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत करण्याच्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु, दिलीप जाधवर, दयानंद लिमण, चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, नीलेश कदम, अक्षय जावळे यांचे पथक कार्यरत झाले होते. रुळे व परिसरातील गावांमध्ये साध्या वेशात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे सिंहगड रोडने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने किरकटवाडी येथे सापळा रचून सी.डब्लू.पी.आर.एस. गेटसमोर आरोपी शंकर कोंडिबा उघडे (वय २५, रा.रुळे विठ्ठलवाडी ता.वेल्हे जि.पुणे), रवींद्र बाळू आखाडे (वय ३५, रा.नांदोशी ता.हवेली जि.पुणे), रोहित शंकर पासलकर(वय १९, रा.रुळे मोरदरी ता.वेल्हे जि.पुणे),विष्णू ऊर्फ इशा रामभाऊ उघडे (वय १८, रा.रुळे, विठ्ठलवाडी, ता.वेल्हे जि.पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्वीचे भांडणावरुनच सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवार, कोयता व कटावणीने वार करुन त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींना पुढील कारवाईसाठी वेल्हा पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. अधिक तपास वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे करीत आहेत.