खळबळजनक! गोळीबार प्रकरणात चार आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:13 PM2020-10-05T17:13:48+5:302020-10-05T17:14:25+5:30
Crime News : या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.
नांदेड - शहरातील महाराजा रणजित सिंहजी मार्केट भागात तीन दुकानावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणात 24 तासाच्या आत पोलिसांनी चार आरोपी अटक केले. या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी जुना मोंढा भागात दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी अवघ्या दहा मिनिटात तीन दुकानावर तब्बल सात गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात आकाश परिहार हा पान टपरी चालक जखमी झाला होता. आरोपीनी विजयालक्ष्मी गारमेंट येथील एका ग्राहकाच्या हातातील दहा हजार रुपये हिसकावून पळ काढला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पथकांना आरोपींच्या शोधासाठी पाठवले होते. रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सकाळी आणखी दोघांना पकडण्यात आले. तर मुख्य आरोपी असलेले दोघे फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असे ही पोलीस अधीक्षक म्हणाले. दरम्यान, प्रथमदर्शनी गोळीबार लुटीसाठीच केल्याचे दिसून येत आहे, दोन आरोपींच्या अटकेनंतर नेमके कारण स्पस्ट होईल अशी माहिती पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोनी द्वारकदास चिखलीकर, पोनी साहेबराव नरवाडे यांची उपस्थिती होती.
घटना घडतात पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, डीबी, उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासात चार जणांना अटक करण्यात आली.