जामीन मिळालेल्या चार आरोपींना दर शनिवारी एलसीबीत हजेरीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:22 PM2021-07-17T22:22:42+5:302021-07-17T22:23:09+5:30
तपासात सहकार्य हवे : चार आरोपींची चार तास चौकशी, प्रकरण जिल्हा बँकेचे
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने म्युच्युअल फंडात ७०० कोटींची गुंतवणूक केली. त्यातून कमीशन स्वरुपात ३ कोटी ३९ लाखांचे ब्रोकरला दलाली (कमीशन) गेले या प्रकरणातील ११ पैकी चार आरोपींना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने जामीन देताना चारही आरोपींना दर शनिवारी दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे लागणार आहे. तसेच या तपासात पोलिसांना त्यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यातील जामीन मिळालेले आरोपी नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, राजेंद्र मोतीलाल गांधी व शिवकुमार गोकुलदास गट्टाणी असे आरोपींची नावे असून त्यांनी शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. त्यांना पोलिसांना तपासाच्या दृष्टीकोणातून सहकार्य करावे लागणार आहे. चारही आरोपींचे पोलिसांनी बयाण नोंदविल्याची माहिती आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ ते २०२० दरम्यान निप्पोन कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये तब्बल ७०० कोटींची गुंतवणूक केली. त्यापोटी ३ कोटी ३९ लक्ष रुपयांची दलाली ब्रोकरला देण्यात आल्याचे प्रकरणी तत्कलीन सीईओ जयसिंग राठोड यांच्यासह ११ जणांवर सिटी कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंदवून सदर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने तीन जणांचा जामीन अर्ज फेटाळला होता हे विशेष!
बॉक्स:
फॉरेन्सिक ऑडिटनंतर चित्र होणार स्पष्ट
या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने डीडीआर हे संबंधित तज्ज्ञ सीएची नेमणूक करून त्यांच्याकडून फॉरेन्सिक ऑडिट तयार करून त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला सादर करणार असल्याचे माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरच यात आणखीन किती कोटींची गुंतवणूक व दलाली दिल्याचे स्पष्ट होणार आहे.