दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 06:21 AM2020-09-23T06:21:37+5:302020-09-23T06:22:09+5:30
ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी होणार : दीपिकाची मॅनेजर, निर्माता मधू मांटेनासह तिघांना समन्स
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर आता आघाडीचे सेलिब्रिटी आले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश, चित्रपट निर्माता मधू मांटेना आणि ‘क्वान’ टॅलेंट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चिटगोपेकर यांना मंगळवारी समन्स बजाविण्यात आले. येत्या आठवडाभरात त्यांच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि अन्य ड्रग तस्करांकडे सुरू असलेल्या चौकशीतून ही नावे समोर आली आहेत. याबाबत अभिनेत्री दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही नावे समोर आली असून त्यांनाही चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुशांतला ड्रग्ज पुरविल्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या अटकेनंतर एनसीबीने अनेकांना अटक केली आहे. तिच्यासोबत ड्रगसंबंधी चॅट करणाºया जया साहा हिच्याकडे दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मंगळवारी तिच्याकडे सुमारे सहा तास विचारणा करण्यात आली. बुधवारीही तिच्याकडे चौकशी केली जाणार असून ‘ड्रग्ज कनेक्शन’ स्पष्ट झाल्याने तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. तिच्याकडे व ड्रग तस्कर अनुज आणि सॅमकडे केलेल्या चौकशीतून ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता मधू मांटेनाचे नाव समोर आले आहे. बॉलीवूडला ड्रग्ज पुरवणाºयांशी त्याचे जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याला समन्स बजाविले आहे.
दिया मिर्झाने केला इन्कार : ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा हिचाही सहभाग असल्याची चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवरून करण्यात येत आहे. मात्र तिने टिष्ट्वटरवरून त्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.
डी, एस, एन, के कोण?
जयाकडील मोबाइल चॅटवर ड्रग्जशी संबंधित डी, एस, एन, के ही अभिनेत्रींच्या नावांची आद्याक्षरे मिळाली आहेत. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचा २0१७ मधील संभाषणाचा एक चॅट समोर आला आहे. त्यात ती करिष्माला पार्टीच्या ठिकाणी ड्रग्ज घेऊन यायला सांगते. ‘क्वान’ टॅलेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चिटगोपेकर यांनी आयोजित केलेल्या पार्टीत बोलावले होते. त्यामुळे त्या दोघांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यानंतर अन्य अभिनेत्रींकडेही चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.