देवांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनवून सट्टेबाजी, जयपूरमध्ये चौघांना अटक; ४.१८ कोटींची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 04:13 AM2020-10-24T04:13:45+5:302020-10-24T07:06:33+5:30
एक लाखासाठी ‘किलो’ आणि एका कोटीसाठी ‘चिकन’ या नावाचा वापर केला जायचा. ऑनलाईनवरील सट्ट्यापैकी उघडकीस आलेला हा मोठा सट्टा होय, असा दावा जयपूर पोलिसांनी केला. सध्या दुबईत आयपीएल किक्रेट स्पर्धा खेळली जात आहे.
जयपूर : देवी-देवतांच्या नावे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सांकेतिक भाषेत आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींच्या टोळाची जयपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी ४.१८ कोटींच्या रोकडसह चार जणांना जेरबंद केले.
एक लाखासाठी ‘किलो’ आणि एका कोटीसाठी ‘चिकन’ या नावाचा वापर केला जायचा. ऑनलाईनवरील सट्ट्यापैकी उघडकीस आलेला हा मोठा सट्टा होय, असा दावा जयपूर पोलिसांनी केला. सध्या दुबईत आयपीएल किक्रेट स्पर्धा खेळली जात आहे. त्या पार्श्वभूमी सट्टेबाजीतील संघटित टोळीबाबत जयपूर पोलीस आयुक्तांचे विशेष पथक गेल्या दोन आठवड्यांपासून माहिती गोळा करीत होते. त्यानंतर पोलिसांनी एका निवासी संकुलावर धाड टाकून रणधीर सिंह (राजकोट) आणि कृपाल सिंह जोधा ऊर्फ अंकित जोधा (अजमेर) यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अन्य बड्या सट्टेबाजांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी १९ मोबाईल फोन, नोटा मोजण्याची दोन यंत्रेही जप्त केली आहेत.
सूत्रधार राजेश राजकोट...
या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचा सूत्रधार राजेश राजकोट असून तो दुबईतून भारतातील अनेक राज्यांत डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम वेबसाईटवर आयडी पासवर्डच्या माध्यमातून सट्टेबाजी करायचा, असे जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले. सट्टेबाजीतून झालेल्या अवैध कमाईच्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आरसी इंटरप्राईज या नावाने एक बँकिंग कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीच्या जयपूर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, भावनगर, मुंबई, कच्छ, जुनागढसह जवळपास ३२१ शाखा आहेत.