वाहन चालकास लुटणाऱ्या चौकडीला अटक तर एक आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:12 PM2021-02-20T19:12:35+5:302021-02-20T19:13:02+5:30
Narpoli police arrested four robbers : नारपोली पोलीसांची कारवाई
भिवंडी - ठाण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या वाहन चालकास पाच जणांच्या टोळीने अडवून त्यास रोडने मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावरील हायवे दिवा पेट्रोल पंपासमोर २९ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी वाहन चालक अमोल सुरेश एडके ( वय २७ रा. पुणे ) याने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नारपोली पोलोसांनी आरोपींचा कसून शोध घेतला असता या मारहाण व लुटमार प्रकरणी अंजुर, आलीमघर, व भरोडी येथून चार जणांना शुक्रवारी अटक केली आहे तर त्यांचा एक साथीदार अजूनही फरार आहे.
जयेश संतोष पाटील ( वय २२ वर्ष , रा. अंजुर ) जय मनोहर पाटील ( रा. अलीमघर ) अजय पाटील ( रा.भरोडीगाव ) हरिश पाटील ( रा. भरोडी गाव ) अशी वाहन चालकास मारहाण व लुटमार केल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. नारपोली पोलिसांनी या चौघांनाही मोठ्या शिताफीतीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तपासात त्यांच्याकडू दरोडयातील मालमत्ताही हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलोसांनी दिली आहे. सदर तपास भिवंडी पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण, सहा.पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे रविंद्र वाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. जे. व्हरकाटे, पोलीस हवालदार सातपुते, पोलीस हवालदार नवले, पोलीस नाईक नाईक, सोनगिरे, पोलीस शिपाई जाधव, बंडगर, माने, पोलीस शिपाइ शिरसाट यांनी केली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी शनिवारी दिली आहे.