अलिबागमध्ये महिलेला लुटणारे चौघे अटकेत, अवघ्या तासाभरात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:42 AM2020-07-08T00:42:32+5:302020-07-08T00:42:39+5:30
अलिबाग : अलिबाग शहरातील सरकारी रुग्णालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याने चालत जात असताना चार चोरट्यांनी महिलेला अडवून आमिष दाखवून ...
अलिबाग : अलिबाग शहरातील सरकारी रुग्णालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याने चालत जात असताना चार चोरट्यांनी महिलेला अडवून आमिष दाखवून तिची फसवणूक केली होती. अलिबाग पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी एका तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर, चौघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत २ जुलैला सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अलका नरेश आमले (५३, रा.चोंढी ता.अलिबाग) या एसटी स्टॅण्ड ररत्यावरून चालत येत असताना, अलिबाग जुनी नगरपालिका नाका येथे येताच त्यांना दोघांनी अडवले. एका ब्रह्मणाला मुलगा झाला आहे. तो गरीब महिलांना साडी, चप्पल व पैशाचे वाटप करीत आहे. तुम्ही तुमचे अंगावरील सोन्याचे गंठण पर्समध्ये काढून ठेवा, तरच तुम्हाला साडी, चप्पल व पैसे भेटतील, अशी बतावणी केली. महिलेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गळ्यातील ८० हजार रुपयांचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र पर्समध्ये काढून ती पर्स पिशवीत ठेवली असता, चोरट्यांनी हातचालाखीने पर्स पळवली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी के.डी. कोल्हे यांनी झालेला प्रकार वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने अलिबाग पोलीस ठाणेचे तपास पथक तयार करून एका तासामध्ये संतोष गंगाराम चौरे (रा.कोपरखैरणे), गोविंद काशिराम काळे (रा.कुळगाव, डोंबिवली), बालाजी कैलास चव्हाण (रा.डोंबिवली), जयराम किसन पवार (रा. कल्याण) यांना तवेरा वाहनासह जेरबंद केले, तसेच आरोपींकडून महिलेच मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींनी रायगड जिल्ह्यात कर्जत पोलीस ठाणे येथे २, पेण पोलीस ठाणे येथे ३ अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग सोनाली कदम, पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पालीस नाईक राजा पिंगळे, पोलीस शिपाई सुनील फड यांनी कारवाई के ली.