खवल्या मांजरांची तस्करी करणार्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 07:56 PM2021-05-07T19:56:00+5:302021-05-07T19:57:37+5:30
Crime News : नाडसूर ते जांभूळपाडा मार्गावर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वारांची चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये खवल्या मांजर आढळून आले.
रायगड - खवल्या मांजरांची तस्करी करणार्या चौघांना सुधागड वन विभागाने अटक केली. गुरुवारी (6 मे) ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी हिरामण बेंडु हिलम (रा. कुंभारशेत), दशरथ लक्ष्मण वालेकर (रा.झाप आदिवासी वाडी), अनिल भागू वाघमारे (रा. चावसर पुणे), रमेश अंकुश जाधव (रा.वांद्रे, ता.मुळशी) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
सुधागड वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनरक्षक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे व कर्मचारी यांनी सापळा रचून ही कारवाई केली. नाडसूर ते जांभूळपाडा मार्गावर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वारांची चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये खवल्या मांजर आढळून आले.