औषधी रसायने चोरणारी चौकडी भिवंडीत गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:52 AM2019-08-16T03:52:41+5:302019-08-16T03:53:09+5:30
औषधी रसायनांची चोरी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकण्यात नारपोली पोलिसांना मंगळवारी यश आले आहे
भिवंडी : औषधी रसायनांची चोरी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकण्यात नारपोली पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. या चोरट्यांकडून तब्बल २९ लाख ३५ हजार २५० रु पयांचा दोन ठिकाणाहून चोरलेला मुद्देमाल जप्त केला.
काल्हेर येथील ओम लॉजिस्टिक प्रा.लि. या ट्रान्सपोर्टच्या गोदामातून २२ ते २६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशाखापट्टणम येथील वसुधा फार्मा केमिकल प्रा.लि. कंपनीने अंजूरफाटा येथील शुभम फार्मा केमिकल प्रा.लि. या मुनिसुव्रत कम्पाउंड राहनाळ येथील कंपनीला पोहोचवण्यासाठी दिलेल्या लोसारटन पोटॅशियम अॅण्ड सायप्रोहेपटेडीन हायड्रोक्लोराइड या औषधी रसायनाची वाहतुकीदरम्यान पाच लाख ६० हजार ५०० रु पयांच्या मालाची चोरी झाली होती. या गुन्ह्याची नोंद झालेली असतानाच पुन्हा त्याच गोदामात बनावट चावीच्या साहाय्याने २० ते २३ जुलैदरम्यान याच रसायनांचे १६ सीलबंद ड्रम लंपास करून तब्बल २७ लाख ३७ हजार ६०० रु पयांची चोरी केली गेली. गोदाम व्यवस्थापक शैलेंद्रकुमार सिंग यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली.
विशाखापट्टणम ते भिवंडी यादरम्यान तब्बल सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या वाहनांतून मेडिसीन पावडर भिवंडीत आणली होती. यामध्ये तब्बल १० वाहनचालकांवर मालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बुºहाडे यांनी तपास करून स्वप्नील पाटील (रा. केवणी दिवे), संतोष म्हात्रे (रा. कशेळी), ओम लॉजिस्टिक प्रा.लि.मधील कामगार लोकेश सैनी (रा. काल्हेर), हरी यादव (रा. ठाणे) या चौघांना ताब्यात घेतले.
या चौघांनी मेडिसीन पावडरचे ड्रम चोरल्याची कबुली दिली. यातील स्वप्नील ठाकºया पाटील हा टेम्पोचालक असून तो मालाची वाहतूक करण्यासाठी ओम लॉजिस्टिक लिमिटेड या ट्रान्सपोर्ट कंपनीत भाडेतत्त्वावर टेम्पो चालवत होता. व्यवस्थापकाची नजर चुकवून त्याने गोदामांची बनावट चावी तयार केली. या दोन्ही गुन्ह्णांतील चोरीला गेलेल्या एकूण ३२ लाख ९८ हजार १०० रु पयांच्या मालापैकी २९ लाख ३५ हजार २५० रुपयांची मेडिसीन पावडर जप्त करण्यात आली आहे.
अशी करायचे चोरी
कामगार लोकेश सैनी हा गोदामात आलेल्या मेडिसीन पावडरच्या मालाची व किमतीची माहिती आपल्या तिघा साथीदारांना देत असे. त्यानंतर, शनिवारी रात्री स्वप्नील पाटील व संतोष म्हात्रे हे दोघे बनावट चावीने गोदाम उघडून तेथील रासायनिक पावडर असलेल्या ड्रमचे सील तोडून त्यामधील महागडी पावडर आपल्याजवळील गोणीत भरून ड्रममध्ये साधी पावडर भरून तो ड्रम सीलबंद करून ठेवत.