जादा रकमेचे आमिष दाखवून व्यावसायिकांना गंडवणारे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:45 AM2019-10-03T05:45:25+5:302019-10-03T05:45:43+5:30
व्यावसायिकांसह सामान्य लोकांना जादा रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे एक कोटींची फसवणूक करणारे अटकेत...
ठाणे : व्यावसायिकांसह सामान्य लोकांना जादा रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे एक कोटींची फसवणूक करणाऱ्या भीमराज मल्लिकार्जुन मालजी ऊर्फ चेतन ऊर्फ सोनूसिंग (३१, रा. गोवंडी, मुंबई)याच्यासह चौघा जणांच्या टोळीला शीळ-डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्याकडून बनावट नोटांसह १० मोबाइल आणि २८ हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील मु्ख्य आरोपी हा टीव्हीवरील गुन्हेगारी मालिकांमध्ये भूमिका करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे
मुंबईच्या कुर्ला येथील नौशाद शेख (४२)या चामड्याच्या व्यापाºयाला परदेशातून आयात केलेले चामडे अल्प किमतीत देतो, असे आमिष दाखवून कमल आणि चेतन यांनी ठाण्यातील कल्याणफाटा येथील हॉटेल शालू येथे १३ जुलै २०१९ रोजी बोलविले. त्यासाठी नौशादकडून त्यांनी दोन लाखांची रक्कम आगाऊ घेतली. ती मिळाल्यानंतर दोघांपैकी एकजण तिथून पसार झाला, तर दुसºयाला बनावट पोलीस घेऊन गेले. त्यामुळे नौशाद यांना पैसेही मिळाले नाही आणि आयात केलेले चामडेही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी शीळ-डायघर पोलीसांत तक्रार दाखल केली होती.
पोलीस उपायुक्त बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक सागर शिंदे, विकास राठोड आणि संतोष तागड आदींच्या तपास पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी प्रत्येक वेळी आपले मोबाइल आणि सीमकार्डही बदलत होते. तरीही, मोठ्या कौशल्याने सावज हेरणारा भीमराज याच्यासह प्रवीण वर्मा ऊर्फ कमल ऊर्फ लल्लू (२९, रा. मुंब्रा, ठाणे), बनावट पोलीस मल्लेश श्रीमंत डिंगी ऊर्फ मल्लू (४७, रा. भिवंडी) आणि चवडप्पा कालोर (३८, रा. भिवंडी, सीमकार्ड पुरविणारा) या चौघांना या पथकाने अटक केली.
आधी एखाद्या सावजाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ते हेरत असत. नंतर, संबंधित व्यक्तीच्या गरजेनुसार ते त्यांना भूलथापा देऊन त्यांची फसवणूक करीत असत. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थान तसेच दादर येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा हवाला देऊन या देवस्थानांकडे बरेच पैसे आणि दागिने पडून असल्याचे सांगून १०० रु पयांच्या नोटांच्या बदल्यात दोन हजारांच्या किंवा पाचशेच्या नोटांची गरज असल्याचे सांगून मोठी रक्कम देणारांना २० टक्के कमिशन देण्याचेही आमिष दाखवून ते जाळ्यात ओढत असत.
जो असे पैसे देण्याची तयारी दर्शवित असे, त्याला शंभराच्या नोटांचे बंडल आणि सोन्याचे बिस्कीट दाखवत असत. या बंडलांमध्ये वरच्या बाजूला काही खºया नोटा ठेवून खाली कोºया कागदाची बंडले ते ठेवत असत. सोन्याची बनावट बिस्किटे दाखवून ती स्वस्तामध्ये देण्याचे आमिष ते दाखवायचे. अशा व्यवहारांच्या वेळी पोलिसांची बनावट रेड पडल्याचे दाखवून तिथून ते पसार होत होते. त्यानंतर, मोबाइल बंद करून सीमकार्डही ते फेकून देत असत.
त्यांनी अशा प्रकारे नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथे दोन, खारघर येथे दोन असे चार गुन्हे केले आहेत. याशिवाय, अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे फसवणुकीचे प्रकार करून अनेकांची सुमारे एक कोटींची फसवणूक केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. त्यांच्याकडून १० मोबाइल, फसवणुकीतील रकमेपैकी २८ हजार रुपये आणि फसवणुकीसाठी वापरलेल्या बनावट नोटा आणि बनावट सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत.
आसाम, उत्तर प्रदेशातील २५६ सीमकार्डचा वापर
आरोपींमध्ये भीमराज मालजी हा टीव्ही मालिकांमधून दाखविल्या जाणाºया गुन्हेगारीवरील आधारित मालिकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारत होता. त्यामुळे पोलीस मोबाइलच्या आधारे गुन्हेगारांचा कसा माग काढतात, हे त्याला चांगले माहिती होते. त्यामुळेच त्यांनी एखाद्याची फसवणूक केल्यानंतर लगेच सीमकार्ड आणि मोबाइलही ते बदलत असत. महाराष्टÑात याचा शोध लागू नये म्हणून आसाम आणि उत्तर प्रदेशातील सुमारे २५६ सीमकार्डचा त्यांनी वापर केल्याची बाब समोर आली आहे. सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.