ठाण्याच्या ड्रग पेडलर्ससह चार गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 04:55 AM2020-11-17T04:55:44+5:302020-11-17T04:55:55+5:30
एमडीसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील ड्रग पेडलर्ससह चौघांना रविवारी दुपारी कामठी मार्गावर अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३७ हजाराची एमडी (मेफेड्रॉन) आणि साहित्यासह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
मोहम्मद ईश्तियाक अन्सारी (वय २७, रा. अंजुमन हायस्कूलजवळ, हसनबाग), सोहेल पटेल मजहर पटेल (वय २२, रा. टेकानाका) तसेच मोहम्मद कफिक मोहम्मद अयूब (वय २४, रा. चांदणी चौक, हसनबाग) आणि मोहम्मद दानिश खालिद अन्सारी (वय २६, रा. नायगाव मार्ग, भिवंडी, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. दानिश अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरात एमडीची तस्करी करतो. त्याची काही दिवसांपूर्वी कफिकसोबत ओळख झाली होती.
त्याच्या माध्यमातूनच तो नागपुरात आला होता. ही माहिती कळताच रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी मार्गावरील पेट्रोल पंपावर ड्रग तस्करांना पकडण्यासाठी फिल्डिंग लावली. प्रारंभी पोलिसांच्या जाळ्यात ईश्तियाक आणि सोहेल अडकले. त्यांना बोलते केल्यानंतर कफिक आणि दानिश पोलिसांच्या हाती लागले. या चौघांकडून पोलिसांनी एक लाख ३७ हजाराचे ३४.३३ ग्रॅम एमडी पावडर, चार मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण ३ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १९ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळविला. त्यांच्याकडून अन्य तस्करांची नावे वदवून घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपिनरीक्षक देवीदास बांगडे, हवालदार प्रदीप पवार, नायक नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, शिपाई, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, अश्विन मांगे, राहुल गुमगावकर, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, रुबिना शेख आणि पूनम रामटेके यांनी ही कामगिरी बजावली.