सायन परिसरातून चार बोगस डॉक्टरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 09:16 PM2019-12-10T21:16:57+5:302019-12-10T21:18:17+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ च्या पोलिसांनी सायन परिसरातून चार बोगस डॉक्टरांना अटक केली
मुंबई - कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करत असणाऱ्या बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी काही डॉक्टरांनाअटकेत केली होती. गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ च्या पोलिसांनी सायन परिसरातून चार बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. सायन पूर्व येथून राकेश रघुनाथ तिवारी (४४), दलसिंग सतई यादव (५९), मोतीलाल विदेशी मोर्या (५१) आणि अनिलकुमार जगदीशप्रसाद बिंद (४१) या चार बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील अनेक भागांत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर होणारी कारवाई तकलादू असल्याने असे बोगस डॉक्टर झोपडपट्टी तसेत दाट वस्त्यांमध्ये आपली दुकाने थाटून रुग्णांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशाच प्रकारे माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ च्या पोलिसांनी मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांसह सायन परिसरात एकाच वेळी ४ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत चारही दवाखान्यात बोगस डॉक्टर मिळून आले. हे चारही बोगस डॉक्टर १२ पर्यंत शिकलेले असून त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही वैद्यकिय पदवी अथवा प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून चारही बोगस डॉक्टरांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.