स्पा चालकाकडे खंडणी मागणाऱ्या चौघांवर गुन्हा; दोघांना अटक
By नामदेव मोरे | Published: May 8, 2023 03:43 PM2023-05-08T15:43:38+5:302023-05-08T15:44:05+5:30
१५ हजार खंडणीसह शरीरसुखाची केली होती मागणी
नवी मुंबई : वाशी सेक्टर ३० मधील स्पा चालक महिलेकडे चार जणांनी प्रतिमहिना १५ हजार खंडणी व शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे.
खंडणीचा आरोप प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश गोवेकर (वय २६), अक्षय सोनावणे(वय २७), ऋतिक केदार व साहील पाटणकर यांचा समावेश आहे. यापैकी गणेश व अक्षय या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाशी सेक्टर ३० मधील फोनिक्स स्पा चा व्यवसाय करणाऱ्या महिलेकडे २५ एप्रिल ते ७ मे दरम्यान या चौघांनी प्रत्येक महिन्याला १५ हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली आहे. नाहीतर तुमच्या स्पा मध्ये वेश्याव्यवसाय होत असल्याची तक्रार करतो अशी धमकी दिली होती. खंडणीसोबत शरिरसुखाचीही मागणी केल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला आहे. ७ मे रोजी संबंधीतांनी गुगलपे द्वारे ५ हजार रुपये स्विकारले असल्यामुळे याविषयी संबंधीतांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.