नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:53 PM2020-02-12T23:53:07+5:302020-02-12T23:54:21+5:30
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आरोपींकडून ४८,३४२ रुपये किमतीची १४ ई-तिकिटे, जुने १५,८४२ रुपये किमतीची १० तिकिटे यासह ६८ हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आरोपींकडून ४८,३४२ रुपये किमतीची १४ ई-तिकिटे, जुने १५,८४२ रुपये किमतीची १० तिकिटे यासह ६८ हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने सोमवारी चार पथक तैनात करून शहरात विविध ठिकाणी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत चिंचभवन वर्धा रोड खापरी येथील नक्षत्र कॉम्प्युटरवर धाड टाकण्यात आली. शंकर विठ्ठल निनावे रा. काचोरे पाटीलनगर, चिंचभवन याच्याकडून ११ लाईव्ह तिकिटे किंमत ३४,५८५, जुनी ३ तिकिटे किंमत ४,६९० रुपये जप्त करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी वैशालीनगर येथील नालंदा कॉम्प्युटर अँड ग्राफिक्समध्ये आरोपी मनीष लक्ष्मण भोयर याच्याकडून १ लाईव्ह तिकीट किंमत ७,५६० रुपये तसेच जुनी २ तिकिटे किंमत २५७५ जप्त करण्यात आली. तिसऱ्या कारवाईत सिंधी कॉलनी खामला येथील श्रीराम टुर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आरोपी जितेंद्र उदय वासवानी रा. खामला याच्याकडून १ लाईव्ह तिकीट ५,२४० जप्त करण्यात आले. तर चौथ्या कारवाईत खरबी येथील एस. बी. ट्रॅव्हल्समध्ये आरोपी श्रीधर मनोहर भुते रा. प्लॉट नं. ७९ याच्याकडून १ लाईव्ह तिकीट किंमत ९५७ रुपये आणि जुन्या ५ तिकिटा किंमत ८,५७७ जप्त करण्यात आल्या. एकूण ४८,३४२ रुपयांची १४ लाईव्ह तिकिटे, १५,८४२ रुपये किमतीच्या जुन्या १० तिकिटा जप्त करण्यात आल्या. चारही कारवाईत आठ हजार रुपये किमतीचे संगणक ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.