आईविना जगू शकत नाही; आठवणीत व्याकुळ झालेल्या ४ मुलांनी वडिलांसोबत केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:07 AM2021-10-24T10:07:07+5:302021-10-24T10:07:22+5:30
नातेवाईकांच्या माहितीप्रमाणे, हदिमानी यांच्या पत्नीला जुलैमध्ये कोविड झाल्यानंतर ब्लॅक फंगसनं पीडित होती. तिचा मृत्यू झाला
बेळगाव – कर्नाटकातील बेळगावात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या आत्महत्येने खळबळ माजली आहे. याठिकाणी ब्लॅक फंगसमुळे पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं निवृत्त सैनिक आणि त्यांच्या ४ मुलाने आत्महत्या केली आहे. ही घटना हुक्केरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. कुटुंबातील ५ जणांच्या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी येत पोलिसांनी तपासाला सुरुवात करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.
पोलिसांनी शनिवारी सांगितले की, गोपाल हदिमानी आणि त्यांची ४ मुलं १९ वर्षीय सौम्या, १६ वर्षीय श्वेता, ११ वर्षीय साक्षी आणि ८ वर्षीय सृजन हदिमानी यांनी शुक्रवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केली. सकाळी हदिमानी कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पोहचले आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि आत घुसले. तेव्हा सर्व मृतदेह पाहून पोलीस हादरले. पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबीयांच्या नातेवाईकांना दिली.
पोलिसांचा तपास सुरू
नातेवाईकांच्या माहितीप्रमाणे, हदिमानी यांच्या पत्नीला जुलैमध्ये कोविड झाल्यानंतर ब्लॅक फंगसनं पीडित होती. तिचा मृत्यू झाला. त्यामुळे गोपाल आणि कुटुंबीय खूप दुखी होते. गोपाल आणि त्यांची मुलं आईच्या मृत्यूनं खूप व्यथित झाली होती. आईविना जगू शकत नाही असं मुलं म्हणायची. त्यामुळेच विष पिऊन सर्वांनी एकत्र आत्महत्या केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.