चार कोटींच्या सिगारेट्सची चोरी, पाच अटकेत, न्हावा शेवा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 01:55 AM2020-12-26T01:55:50+5:302020-12-26T01:56:17+5:30
crime news : फेब्रुवारी २०१९ ते डिसेंबर २०२० पर्यंत कस्टम एजंटच्या साहाय्याने यातील २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेट स्टिक्स अज्ञात इसमांनी चोरून नेल्या होत्या.
नवीन पनवेल : कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून ४ कोटींच्या सिगारेट्सची चोरी करणाऱ्या पाच जणांना न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे. कस्टम हाउस एजंटच्या साहाय्याने ही चोरी करण्यात आली होती.
कस्टम विभागाने २०१९ मध्ये ४ कोटी १९ लाख ९० हजारांचे कालबाह्य आणि आरोग्यास हानिकारक असलेले गुडंग गरम सिगारेट स्टिक्स जप्त केले होते. हे सिगारेट न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पीडी सीएफएस सोनारी गाव येथे सीलबंद कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते.
फेब्रुवारी २०१९ ते डिसेंबर २०२० पर्यंत कस्टम एजंटच्या साहाय्याने यातील २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेट स्टिक्स अज्ञात इसमांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश फुले व त्यांच्या पथकाने यातील पाच आरोपींना पुणे, नवी मुंबई, मुंबई येथून अटक केली. यात कस्टम हाउस एजंटचा सहभाग आहे. त्याच्या मदतीनेच आरोपींनी सिगारेट चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील सिगारेट भिवंडी येथील गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या. तर काही सिगारेट इतरांना विकल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी ६९ लाख २७ हजार ९२० रुपये किमतीच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.