विमा कंपनीला चार कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:17 AM2021-01-09T06:17:26+5:302021-01-09T06:17:41+5:30
विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा काढण्यास संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असते. यामध्ये कामगारांचे नुकसान असल्याने कामगारांचा विमा बंधनकारक करावा, यासाठी अग्रवाल हे प्रयत्नशील होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा बंधनकारक करण्यासाठी कामगार कार्यालयात वशिला लावून देतो, असे सांगून कंपनीची ४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित विमा कंपनीने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. इसिलिंक इन्शुरन्स सर्व्हिस या कंपनीचे प्रमुख प्रमोदकुमार अग्रवाल (६२) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा काढण्यास संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असते. यामध्ये कामगारांचे नुकसान असल्याने कामगारांचा विमा बंधनकारक करावा, यासाठी अग्रवाल हे प्रयत्नशील होते. यादरम्यान जून २०१८ मध्ये त्यांची निर्वाणा इंडिया ग्रुपचे आदित्य जोगानी यांच्यासोबत भेट झाली. या वेळी जोगानी यांनी आपली शासनाच्या कामगार विभागात ओळख असल्याचे सांगितले.
या ओळखीतून विदेशी जाणाऱ्या कामगारांना विमा बंधनकारक करून घेतो, असा विश्वास दिला. त्यासाठी चार कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अग्रवाल यांनी चार कोटी रुपयांचे धनादेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे धनादेश वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे वटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.