चारशे प्रवाश्यांना बेस्ट बसचे बोगस पास विकणारी टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 11:45 PM2018-11-02T23:45:32+5:302018-11-02T23:50:37+5:30
नवीन ग्राहक मिळवून देणाऱ्या अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशल पाटील या तीन एजंट देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
मुंबई - बेस्ट बसचे बोगस पास तयार करून ते विकणाऱ्या एक टोळी काल चेंबूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या टोळीने चारशे प्रवाशांना बोगस पासची विक्री केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
३१ ऑक्टोबर रोजी वाशी नाका येथून कुर्ला येथे ३६९ क्रमांकाच्या बसमध्ये तिकीट तपासनीस राम शिंदे हे तिकीट आणि पास तपासण्याचे काम करत होते. तिकीट तपासणीदरम्यान पाशा शेख या प्रवाश्याकडे असलेल्या पास बोगस असल्याचा संशय आल्याने शिंदे यांनी कॉम्प्युटरवर तपासणी केली. त्यावेळी हा पास बनावट बनविणाऱ्यांचे भांडे फोड झाले.
चेंबूर पोलिसांनी पाशा याची कसून चौकशी केली त्यावेळी ट्रायमॅक्स कंपनीत काम करणारा अनिकेत जाधव हा बनावट पास पुरवत असल्याचे समजले. चेंबूर पोलिसांनी वडाळा बस डेपोमधील ट्रायमॅक्स कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून अनिकेतला अटक केली. पाशा आणि अनिकेत यांच्या अटकेनंतर त्यांना नवीन ग्राहक मिळवून देणाऱ्या अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशल पाटील या तीन एजंट देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.