भिवंडीत एकाच दिवसात घरफोडीच्या चार घटना; वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश
By नितीन पंडित | Published: August 29, 2022 04:35 PM2022-08-29T16:35:31+5:302022-08-29T16:36:27+5:30
भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी व चोरीच्या एकाच दिवसात चार घटना घडल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
भिवंडी :
दि.२९- भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी व चोरीच्या एकाच दिवसात चार घटना घडल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.पहिल्या घटनेत भांडी दुकानदार मितेश केसरीमल जैन यांचे प्रभुआळी येथील लक्ष्मी मोहन स्मृति सदन या इमारतीमध्ये भांड्याचे गोदाम आहे.त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गोदामाच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून गोदामात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे घंटी, हंडा कळशी,समई, परात अशा पितळेच्या भांड्यांची चोरी केली आहे.याप्रकरणी मितेश जैन यांनी रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कारीवली गावाच्या हद्दीतील वसंतनगर येथील चाळीत निखील परशुराम नाईक यांचे चायनीज फुडपॉईंट सेंटर नावाचे दुकान आहे . शनिवारी मध्यरात्री चायनिज सेंटर बंद करून घरी गेले असता रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील टेलिव्हिजन व रोख रक्कम असा २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे .याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहनाळ ययेथील मुनीसुरत कंपाऊंड येथील एका इमारती मध्ये असलेल्या धनलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या वाहतूक कंपनीच्या गोदामात ठेवलेले १ लाख २० हजार ६९१ रुपये किमतीच्या ६ अल्युमिनियम प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्या आहेत .या प्रकरणी धनलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे प्रभाकर मिश्रा यांनी नारपोली पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे.
चौथी घटना शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे .पिरणीपाडा गैबीपीर रोड येथील इमारती मध्ये राहणारे शशिकुमार कृष्णा तईल यांचे घर बंद असताना त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चोरी केली आहे.शहरात पोलीस बंदोबस्त,गस्त,नाकाबंदी अशा विविध उपाययोजना करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करीत असतानाही घरफोडी व चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली आहे.