नकली नोटा घेऊन फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघे जेरबंद; टेंभूर्णा फाट्यावरील घटना
By अनिल गवई | Published: January 28, 2024 01:30 PM2024-01-28T13:30:46+5:302024-01-28T13:31:08+5:30
अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, , खामगाव, जि. बुलढाणा: अप्पर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभूर्णा फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली. यात चौघांना जेरबंद करण्यात आले. यातील एकावर यापूर्वीच नकली नोटाप्रकरणी एक कारवाई झाली आहे.
तक्रारीनुसार, खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले. दरम्यान, बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली. त्यावेळी काळ्या रंगाची बॅग, ५०० रुपये दराच्या ८४९ व २०० रुपयांच्या दोन, १०० रुपयांच्या आठ, ५० रुपये किंमतीच्या दोन, २० रुपयांची एक तर १० रूपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा, सहा मोबाईल, सेलोटेप, कैची, एमएच १२ व्हीएफ ७७७५ क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा एकुण १४ लाख ५८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिल्ड्रेन बँकेच्या ६१०० रुपयांच्या नोटांच्या बंडलावर खऱ्या नोटा चिटकवून फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते. मात्र, पोलीसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केले.
याप्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे (३४ रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मयुर किशार सिध्दपुरा (३४), विलास बाबुराव ठाकरे (३८) दोघेही रा. रा. अभय नगर,दंडेस्वामी मंदिराजवळ,खामगाव, लखन गोपाल बजाज (३३, रा. दंडेस्वामी मंदिराजवळ) यांच्या विरोधात भादंवि कलम ४८९ ब, ४८९ क, ४८९ ई, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे, यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरुण परदेशी, एपीआय गोंदके, पीएसआय विनोद खांबलकर, निलसिंग चव्हाण, प्रविण गायकवाड, केशव झाटे, कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली.