पुसद: कान्हा फाट्यावर चार किलो गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक
By विशाल सोनटक्के | Published: April 8, 2024 03:22 PM2024-04-08T15:22:41+5:302024-04-08T15:32:38+5:30
पंकज विष्णू कटारे या २१ वर्षीय आरोपीविरोधात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशाल सोनटक्के, यवतमाळ: पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कान्हा फाटा येथे सुमारे एक लाख रुपये किमतीचा चार किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. याप्रकरणी पंकज विष्णू कटारे या २१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुसद तालुक्यातील मौजे कान्हा येथील पंकज विष्णू कटारे हा गांजा विक्रीसाठी बाहेर घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस पथकाने माहूर रोडवरील कान्हा फाटा येथे सापळा रचून कटारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार किलो गांजा व एक मोबाइल असा एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.