उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे अपहरण करणारी चौकडी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 06:47 PM2020-08-29T18:47:12+5:302020-08-29T18:47:36+5:30
अपहरणाच्या दिवशी हिललाईन पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता.
उल्हासनगर : जीन्स व्यापारी सनी अनवानी यांचे गेल्या आठवड्यात पिस्तुल व चाकूचा धाक दाखवित अपहरण करुन वडिलांकडे १० लाखाची खंडणी मागणाऱ्या चौघडीला हिललाईंन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून अन्य गुन्हाची माहिती मिळते का?. याबाबत पोलिस अधिक तपास करीत असून त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.
उल्हासनगर काम-५ भाटिया चौकातून जिन्स व्यापारी सनी अनवाणी यांनी २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता दुकानावर जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसताच रिक्षात बसलेल्या तरुणांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हाजी मलंग परिसरात नेल्यावर अपहरणकर्त्यांनी सनी यांच्या वडिलांना फोन करून दहा लाखाची खंडणी मागितली. मात्र पैसे स्वीकारण्यास अडचण येत असल्याने, त्यांनी सनी याला सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान डी-मार्ट पालेगाव अंबरनाथ येथे रिक्षातून फेकून दिले. तसेच त्याचा मोबाईल घेऊन फरार झाले. सनी यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अपहरणाच्या दिवशी हिललाईन पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. परंतु आधी पैसे द्या, त्यानंतर दहा मिनिटांनी मुलाला सोडतो. असे अपहरणकर्ते सनीच्या वडिलांना सांगत असल्यामुळे, सदर आरोपींची ओळख पटलेली नव्हती. तसेच घटनास्थळावरून काही उपयुक्त माहिती प्राप्त नाही. त्यानुसार हिललाईन पोलीस व गुन्हे शाखा स्वतंत्रपणे सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत होते. हिललाईन पोलीसाना मिळालेल्या संशयित आरोपींच्या माहिती व तांत्रिक विश्लेषण आधारे शुक्रवारी गुन्ह्यातील चार जणांना अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून ४ आरोपी पैकी ३ बदलापूर तर एक जण उल्हासनगरात राहणारा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मोहन खंदारे करीत आहेत.