नागपुरात जेसीबी विक्रीचे आमिष दाखवून चार लाखाने फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:07 PM2019-11-18T22:07:53+5:302019-11-18T22:10:13+5:30
वाडी परिसरातील व्यावसायिक उपकरण विक्रीशी संबंधित दोन आरोपींनी एका युवकाला चार लाखाने फसविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडी परिसरातील व्यावसायिक उपकरण विक्रीशी संबंधित दोन आरोपींनी एका युवकाला चार लाखाने फसविले.
पंकज विठ्ठलराव देशमुख रा. अमरावती आणि रमेश ऋद्राप रा. वाडी अशी आरोपीची नावे आहे. फिर्यादी विलास चव्हाण (२१) रा. देवळी टाकळी जि. अकोला आहे. विलास चव्हाण याला व्यवसायासाठी जेसीबी मशीन खरेदी करायची होती. यासाठी २८ डिसेंबर २०१८ रोजी विलास त्याचा मित्रासोबत अमरावती रोड वाडी स्थित इंडिया वेअर हाऊस येथे आला होता. तिथे त्यांची आरोपी पंकज देशमुख व रमेशसोबत ओळख झाली. दोघांनीही त्याला माफक दरात जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी पंकजने विलासला त्याच्या बँक खात्यात एक लाख रुपये तर रमेशने तीन लाख रुपये जमा करण्यास सांगितले. विलासने दोघांच्याही खात्यात पैसे जमा केले. परंतु पैसे जमा केल्यावरही जेसीबी मशीन मात्र मिळाली नाही. यानंतर संपर्क साधल्यावर आरोपी पैसे परत करण्यासही टाळाटाळ करु लागले. त्यामुळे फिर्यादीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.