चौघा अल्पवयीन भावंडांची झोपेत हत्या; पालक बाहेरगावी असताना घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:23 AM2020-10-17T07:23:12+5:302020-10-17T07:23:24+5:30
जळगाव जिल्ह्यातील घटना; अत्याचाराचा संशय
रावेर (जि. जळगाव) : शहरानजीक असलेल्या केळीबागेत रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन भावंडांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सविता (वय १४), राहुल (११), अनिल (८ वर्षे) व सुमन उर्फ नाणी (५ वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत.
एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. चौघांचे मृतदेह हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळी उशिरा आल्याने यापैकी मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून उर्वरित तिघांचे शनिवारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालेले नाही़ वैद्यकीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे़
सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास चौघांचे मृतदेह हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़. मात्र, सायंकाळी उशीरा शवविच्छेदन होत नाही, असे सांगत केवळ मुलीच्या मृतदेहाचेच शविविच्छेदन करण्यात आले़. मध्यप्रदेशातील गढी (जि.खरगोन) येथील महेताब भिलाला हे अनेक दिवसांपासून शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या शेतात रखवालदार आहेत. बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या बागेनजिक ते पत्नी व पाच मुलांसह राहात आहेत. महेताब हे पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी नातवाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. त्यांची चार मुले घरीच थांबली होती. त्यावेळी ही घटना घडली.
नेमके काय झाले?
शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेतमालक शेख मुस्तफा (रा. मण्यारवाडा, रावेर) शेतात आले. रखवालदाराच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. घरात खाटेवर एकट्या झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे क्रूर कृत्य झाले असावे, असा संशय आल्याने त्यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक चौकशी करत आहे. दरम्यान, महेताबचा मोठा मुलगासंजय याने त्याच्या काही मित्रांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यावरून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.