चार अल्पवयीन मुलांना दिली कंत्राटदाराला मारण्याची सुपारी, पोलिसांनी असा दाखवला इंगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:59 IST2022-03-16T20:58:12+5:302022-03-16T20:59:11+5:30
पुर्वेकडील कैलासनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिपीन मिश्रा या बांधकाम कंत्राटदारावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.

चार अल्पवयीन मुलांना दिली कंत्राटदाराला मारण्याची सुपारी, पोलिसांनी असा दाखवला इंगा!
कल्याण:
पुर्वेकडील कैलासनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिपीन मिश्रा या बांधकाम कंत्राटदारावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्हयात चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्यांना हल्ल्याची सुपारी देणा-यासह, एका बांधकाम कंत्राटदाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
बिपीन मिश्रा हे चाळीतील घरे दुरूस्तीचे कंत्राट घेतात. त्यांच्यावर दिवसाढवळया खुलेआम झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस तपास करीत होते. कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी कसोशिने तपास करत याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सोनू नावाच्या व्यक्तीने बिपीनवर हल्ला करण्यासाठी त्यांना 10 हजार रूपये दिले होते अशी माहीती समोर आली.
पोलिसांनी सोनूला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने प्रमोद चव्हाण याने मला हल्ला करण्यासाठी 25 हजार रूपये दिले होते असे सांगितले. त्यालाही पोलिसांनी अटक केली असून दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 19 मार्चर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. चव्हाण हा देखील चाळ बांधकाम कंत्राटदार असून व्यवसायाच्या वादातून त्याने बिपीनला मारण्याची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. चार अल्पवयीन आरोपींची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.