दारू देण्यास नकार दिल्याने वाईन शॉप मालकावर प्राणघातक हल्ला; चौघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:39 PM2019-10-16T21:39:43+5:302019-10-16T21:43:45+5:30
हल्ल्यासाठी वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकीही जप्त केली आहे.
मडगाव - वाईन शॉप मालकावर चाकू हल्ला प्रकरणी गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी रात्री मडगाव शहरातील घोगळ येथे प्राणघातक हल्ल्याची ही घटना घडली होती. कुमार किमू चव्हाण (24), राजेश मंतास बुधियार (24), शरणू बीरु मार्टीन्स व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हल्ल्यासाठी वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकीही जप्त केली आहे.
अल्पवयीन मुलाला मेरशी येथील अपना घरात पाठवून दिले आहे तर अन्य कुमार चव्हाण व राजेश बुधियार या दोघांना संशयितांना अधिक तपासासाठी पाच दिवसांसाठी रिमांड देण्यात आला आहे. शरणू याला उदया गुरुवारी रिमांडसाठी न्यायालयापुढे उभे करणार आहे. या प्रकरणातील अन्य दोघेजण सध्या फरार असून त्यांचा शोध चालू आहे. रविवारी रात्री बाराच्या दरम्यान हल्ल्याची ही घटना घडली होती. या हल्ल्यात वाईन शॉप मालक फ्रेडी डायस हे जखमी झाले होते. दारु देण्यास नकार दिल्याने संशयितांनी हा हल्ला केला होता. भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 324, 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. संशयितांनी तोंडावर मास्क घातले होते.
रविवारी रात्री डायस हे दुकान बंद करुन घरी गेले होते. आर्ले येथे पोहचल्यानंतर त्यांना आपण मोबाईल दुकानातच विसरुन आले असल्याचे उमजून आल्यानंतर ते पुन्हा घोगळ येथील आपल्या वाईन शॉपकडे आले. नंतर शटर उघडून मोबाईल घेतल्यानतंर त्यांनी दुकान बंद करीत असताना तेथे सहाजण आले. त्यांनी दारुची ऑर्डर केली. यावेळी वेळ झाल्याचे सांगून डायस यांनी त्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात डायस हे जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला होता. पोलिसांनी काल कुमार किमू चव्हाण (24), राजेश मंतास बुधियार (24), व एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. पोलीस तपासात शरणू याचेही नाव पुढे आल्यानंतर त्यालाही ताब्यात घेउन नंतर अटक करण्यात आली.