कोकेन तस्करीप्रकरणी आरे चेक नाका येथून नायजेरीयन चौकडीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:26 PM2019-05-21T14:26:37+5:302019-05-21T14:53:03+5:30
२ लाख ४० हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
मुंबई - कोकेन तस्करीप्रकरणी नायजेरीयन चौकडीला अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) आरे चेक नाका येथून अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
पॉल अन्यायू ओसीनकाची (३१), ओकीचिकू ओबाना मटीन्स (३५), गॉडवील डिके चिताची (२७), रुबेन अजाह गॉडवीन (२६) अशी अटक नायजेरीयनची नावे आहेत. रविवारी एएनसीचे पथक आरे चेक नाका परिसरात गस्त घालत असताना, चार नायजेरीयन संशयास्पदरीत्या टॅक्सीतून फिरताना दिसले. त्यानुसार, पथकाने पाठलाग सुरू केला. आरे रोड परिसरात टॅक्सी अडवून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६० गॅ्रम कोकेन सापडले. त्यानुसार त्यांना अटक करीत, त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. यापूर्वीही कलिना विद्यापीठात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन तस्करांना अटक करण्यात आली होती. या चौकडीचे त्यांच्याशी काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.