वर्ल्डकपच्या सट्टेबाजीत पोलिसासह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 06:34 AM2019-06-27T06:34:01+5:302019-06-27T06:34:12+5:30
आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या वर्ल्डकप सामन्यावर दादरमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर माटुंगा पोलिसांनी मंगळवारी छापा मारला.
मुंबई - आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या वर्ल्डकप सामन्यावर दादरमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर माटुंगा पोलिसांनी मंगळवारी छापा मारला. यात, बुकींसह पोलीस उपनिरीक्षकालाही पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे (३४) असे पोलिसाचे नाव असून तो भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानक पूर्वेकडील रामी गेस्ट लाईन हॉटेलमध्ये मिकीन शहा (३३) नावाचा बुकी वर्ल्डकपच्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली.
त्यानुसार मंगळवारी तपास पथकाने रात्री या हॉटेलवर छापा टाकला. वर्ल्डकप सिरीजमधील आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्यावर लोटसबुक डॉट कॉम या वेबसाईटद्वारे ही मंडळी सट्टा लावत असल्याचे दिसून आले. त्यानुसार बुकी शहासह साथीदार मनीष सिंग, प्रकाश बनकर यांना ताब्यात घेण्यात आले. खरमाटेही तेथे १ लाख ९३ हजार रुपये आणि ६ मोबाईलसह सापडला. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी खरमाटे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सिंगे यांनी दिली.
यापूर्वी माटुंगामध्ये डिटेक्शन अधिकारी
भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत खरमाटे हा डिटेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होता. यापूर्वी तो माटुंगा पोलीस ठाण्यातही डिटेक्शन अधिकारी होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.