मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचे मुंडण केल्याप्रकरणी चार शिवसैनिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 08:50 PM2019-12-26T20:50:51+5:302019-12-26T21:25:15+5:30
उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी चोप दिला होता.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे मुंडण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आज संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे, श्रीकांत यादव यांच्यासह इतरांविरोधात भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी चोप दिला होता. तसेच भरचौकात त्यांचे केस कापून मुंडन केले होते. त्यानंतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई केली होती.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी (३३) या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मात्र, त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी कायदाच हातात घेत तिवारी यांचे मुंडन केले होते.