ओएलएक्सवरून फसवणुकीच्या गुन्ह्यात वर्षात चौपट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:52 AM2019-09-17T11:52:15+5:302019-09-17T11:56:21+5:30
गेल्या वर्षी पुण्यात ओएलएक्सवरील खरेदी-विक्रीमध्ये २२५ जणांची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते़..
विवेक भुसे -
पुणे : जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ओएलएक्स या प्लॅटफॉर्मचा वापर हॉकर्सनी लोकांच्या फसवणुकीसाठी सुरू केला असून त्यातून प्रामुख्याने तरुणांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे़. पुणे शहरात गेल्या वर्षीपेक्षा ओएलएक्सवरून फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल चौपट वाढ झाली आहे़.
गेल्या वर्षी पुण्यात ओएलएक्सवरील खरेदी-विक्रीमध्ये २२५ जणांची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते़. यंदा १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल ८२४ जणांनी फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल केले आहेत़. सोमवारी तब्बल एकाच दिवशी सायबर पोलीस ठाण्यात १४ फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत़. दिवसेंदिवस ओएलएक्सवरून खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीत वाढ होत आहे़.
ओएलएक्स हा ऑनलाईन खरेदी-विक्रीचा प्लॅटफॉर्म आहे़ त्यावर तुम्हाला एखादी वस्तू विकायची असेल तर जाहिरात करू शकता़. ज्यांना ती वस्तू खरेदी करायची आहे़ ते तुमच्याशी संपर्क करून पुढे आर्थिक व्यवहार करतात़ प्रत्यक्षात दोघेही एकमेकांना पहात नसल्याने या ऑनलाईन व्यवहारात पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा हॉकर्स घेऊ लागले आहेत. यावर प्रामुख्याने मोटारसायकली, मोटारी यांच्या खरेदीच्या जाहिराती दिसून येतात़ चांगली वाहने स्वस्त किमतीत मिळत असल्याचे पाहून लोक त्या खरेदी करण्यासाठी संपर्क साधतात़. तेव्हा त्यांना अगोदर काही रक्कम आगाऊ द्यावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे मागवितात किंवा त्यांना बँक खात्याचा क्रमांक देऊन त्यावर पैसे भरायला सांगतात़. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जाते़. त्यानंतर विक्री करणाºयाचे मोबाईल बंद होतात़. वाहनांच्या खालोखाल महागडे मोबाईल विक्रीच्या जाहिरातीतून फसवणूक होत असल्याचे आतापर्यंत पोलिसांकडे येत असलेल्या तक्रारीवरून दिसून आले आहे़.
वाहन विक्रीच्या जाहिरातीतील अनेकदा लष्करातील जवान असल्याचे भासविले जाते़. बदली झाल्याने वाहन विक्री करायची असल्याचे सांगून त्यांच्या कँटीनचे ओळखपत्रही खरेदी करण्याची इच्छा दर्शविण्याला पाठविले जाते़ जवानाचे नाव पाहून लोक विश्वास ठेवतात व तेथेच फसत असल्याचे दिसून आले आहे़.
याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले, की ओएलएक्स हा खरेदी-विक्रीचा प्लॅटफॉर्म आहे़. त्यावरून खरेदी-विक्री करताना आपण ज्याला पाहिले नाही, त्याला ओळखत नाही, त्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतो़ गुगल अथवा अन्य ठिकाणी दिलेली माहिती ही खरी असलेच, याची कोणी खात्री देऊ शकत नाही़ त्यामुळे कोणालाही पैसे पाठविताना अथवा स्वीकारताना या आॅनलाईन व्यवहाराची संपूर्ण माहिती असेल तरच त्याचा वापर करावा़.
.........
ओएलएक्सचा वापर करताना अथवा त्यावरून खरेदी-विक्री करताना संबंधिताने दिलेली माहिती ही खोटीही असू शकते़. त्याची खात्री करावी़ तसेच पैसे पाठविताना ऑनलाईन व्यवहाराची संपूर्ण माहिती असेल तरच व्यवहार करावा़. अन्यथा संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेऊन खात्री करावी़ - जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.
.........
२०१८ - २२४
१५ सप्टेंबर २०१९ पर्यंत - ८२४