शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:37 PM2019-11-29T23:37:22+5:302019-11-29T23:37:57+5:30
पूर्वेकडील परिसरात असलेल्या एका क्लासमध्ये भागीदारी देतो असे सांगून एका शिक्षकाकडून लाखो रुपये तर घेतले पण त्याला भागीदारी न देता त्याची फसवणूक केली.
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात असलेल्या एका क्लासमध्ये भागीदारी देतो असे सांगून एका शिक्षकाकडून लाखो रुपये तर घेतले पण त्याला भागीदारी न देता त्याची फसवणूक केली. तसेच त्याने पैसे परत मागितल्यावर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने संबंधित शिक्षकाने मानसिक दबावाखाली येत वसईत लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. वसई रेल्वे पोलिसांनी त्यावेळी अपघाती मृत्यूची नोंद करून हा गुन्हा अधिक तपासासाठी तुळींज पोलिसांकडे वर्ग केला होता. मृत शिक्षकाच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे तसेच पोलिसांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार शिक्षकांविरूद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. ज्याने आत्महत्या केली त्या शिक्षकाचे ३० नोव्हेंबरला लग्न होणार होते. पण दुर्दैवाने त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील चंद्रेश दर्शन इमारतीत राहणारे आशुतोष हनुमंत सिंह (२७) यांना मे, जून २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान पीव्हीआर क्लासेसमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून राहुल बसंतीलाल जैन, वैभव अवस्थी, नरसिंग उर्फ परमार आणि प्रमोद मोरे या चौघांनी आशुतोषकडून २० लाख रुपये घेतले. नंतर त्याला ना भागीदारी दिली ना दिलेले पैसेही परत केले. उलट त्याने पैशाची मागणी केली तर या चौघांनी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली. शिवाय, दुसऱ्या क्लासेसमध्ये काम मिळणार नाही आणि बदनामी करू असेही सांगितले.
यामुळे आशुतोष मानसिक दबावाखाली आले आणि त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी वसई रेल्वे स्थानकात हॉलिडे एक्स्प्रेस या गाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येस हे चौघे जवाबदार असल्याचे भाऊ संदीप हनुमंत सिंह (२९) याने सांगत तुळींज पोलीस ठाण्यात गुरु वारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.